पारनेर – पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना डावलून निलेश लंके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी मिळाल्याने नाराज झाले होते. अखेर त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश केला.
झावरे हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा तालुक्यामध्ये होत होत्या. परंतु भाजपमध्ये प्रवेश कधी करतात याची उत्सुकता लागली होती. आज ते भाजपवासी झाले. झावरे हे भविष्यामध्ये भाजपमध्ये आपले राजकीय भवितव्य प्रस्थापित करणार हे स्पष्ट झाले आहे.
झावरे हे माजी आमदार कै.वसंतराव झावरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य या पदावर ते राहिले. गेल्या अनेक दिवसापासून ते राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वावर नाराज असल्याचे दिसून येत होते. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष उमेदवारी देईल अशी आशा होती, परंतु ऐनवेळी राष्ट्रवादीने बाहेरून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते.
पारनेर तालुक्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सत्ताधारी पक्षामधून अनेक विकास कामे करता येतील व तालुक्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर एक टीएमसी पाणी तालुक्याला देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून घेतले आहे.
सुजित झावरे, युवा नेते