आमदार लांडगे यांचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’

राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

भोसरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते वसंतनाना लोंढे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, चऱ्होलीचे माजी नगरसेवक घनश्‍याम खेडकर, माजी नगरसेविका आशा सुपे, नगरसेविका विनया तापकीर यांचे पती प्रदीप तापकीर, राष्ट्रवादीकडून 2017 साली महापालिकेची निवडणूक लढवलेले संजय पठारे, चिखलीचे सुनील लोखंडे, निलेश नेवाळे, एस. डी. भालेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे चऱ्होली, चिखली, मोशी आणि दिघी या चार गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्याला वेळोवेळी डावलले. महापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद, विधानसभेची उमेदवारी यापासून वंचित ठेवले. आपला केवळ वापर केला त्यामुळे आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे ज्येष्ठ नेते वसंत लोंढे यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत आमदार महेश लांडगे यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम केले, नवीन समाविष्ट गावांमध्ये विकासाची अनेक कामे केली. व्हिजन 20-20 हा भोसरी विधानसभेचा सर्वांगीण विकास करणारा आराखडा आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्‍न सुटणार आहेत. ग्रामीण भागातील समाविष्ट गावांचे विकासाचे मॉडेल या त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन आमदार महेश लांडगे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय माझ्यासह अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतल्याचे वंसत लोंढे म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.