ठाणे – कंत्राटदाराकडून पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना ठाणे जिल्ह्यातील पीडब्ल्यूडीच्या ऑडिटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे. गणेश दशरथ ठाकरे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कंत्राटदाराने मुंबईतील पोलीस रुग्णालयात डायलिसिस सेंटर बांधण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या कामसाठी आरोपीने ठेकेदाराकडून 40 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या निविदेशी संबंधित काम करण्यासाठी ठेकेदाराकडून 15 हजारांची मागणी केली. याबाबत ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडे तक्रार दिली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.
आरोपी हा मुंबई येथे कार्यकारी अभियंता कार्यालयात वरिष्ठ विभागीय ऑडिटर म्हणून काम करतो. त्यांनी ठाण्यातील एका ठेकेदाराकडून लाच मागितल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ठाणे जिल्ह्यात याआधी एसीबीने औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता कल्याण पाटील यांना अटक केली होती. सीबीडी बेलापूर परिसरात कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्याने पुलाला रंग आणि खारघर रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉक साफ करण्यासाठी ठेकेदाराकडून 30 हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला 30 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.