सातारा (प्रतिनिधी) – सातारा पालिकेचा माजी नगरसेवक व पालिकेचे दोन कर्मचारी यांना रविवारी दुपारी तातडीने क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्या घशाचे स्त्राव घेण्यात येणार आहेत.
मुंबईवरून दुचाकीवर आलेला युवक शुक्रवारी साताऱ्यात आला होता. मात्र शनिवारी त्याने स्वतः जिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली. हा युवक थेट रविवार पेठेत पोहोचल्याने येथील एका माजी नगरसेवकाने त्याची कागदपत्रे हाताळली.
या नगरसेवकाने याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली. सर्वेअर म्हणून एक अतिक्रमण व वसुली विभागाचा कर्मचारी तातडीने रविवार पेठेत रवाना झाले. तो युवक जेथे मुक्कामी राहिला त्या रूमला त्यांनी भेट दिली. मात्र या तिघांचा संपर्क लो रिस्क प्रवर्गातील असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाचे प्रमुख उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी माजी नगरसेवक व दोन कर्मचारी यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना दोन आठवड्यासाठी क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.