संगमनेर -शहराबरोबर आता ग्रामीण भागातही करोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचा विषय झाला आहे. शहरानजीक असलेल्या घुलेवाडी परिसरात एका डॉक्टरला करोना झाल्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या राजापूर, चिंचोली गुरव येथील 11 तर शहरातील दोघे असे 13 जणांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या घुलेवाडी येथील डॉक्टरने तीन दिवसात अमृताची संगत उठविण्यासह स्वतःच्या मुळगावी ही फेरफटका मारून आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. घुलेवाडीतील डॉक्टरांचा 27 मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापूर्वी 24 मे रोजी यांची सासुरवाडी राजापूर येथे जाऊन त्यांनी पाहुणचार घेतला. त्याचबरोबर आपले मुळ गाव चिंचोली गुरव येथेही तीन दिवसांपूर्वी फेरफटका मारला आणि तेथेही इतरांशी गाठीभेटी घेतल्या अशा 11 जणांची तपासणी करण्यात येणार आहे.
तर मदिनानगर येथील दोघे बुधवारी रात्री घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आले असता त्यांच्यात लक्षणे संशयास्पद वाटल्याने त्यांनाही नगरला रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच दिवशी संगमनेर तालुक्यातून जिल्हा रुग्णालयात 13 जणांना पाठविण्यात आले असून त्यांचे स्राव घेतले आहे.त्यांच्या अहवालकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. संगमनेर तालुक्यात करोनाचे संक्रमण कायम असून त्यात आणखी एका कोरोना बधिताची भर पडली आहे. संगमनेर शहरातील भरतनगर येथील एका 66 वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहे.