भोर -भोर तालुक्यातील करोना बाधितांच्या संख्येत गेल्या चार दिवसांपासून वाढच होत आहे. मानकरवाडीतील बाधित रुग्णाची पत्नी आणि मुलगा, धारांबेवाडीतील बाधिताच्या संपर्कात आलेल्या दोघांचा करोना अहवाल गुरुवारी (दि. 28) पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 12वर पोहोचली आहे.
तर नाझरेतील एका करोना संशयित वृद्धाचा आज मृत्यू झाला असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. अहवाल निगेटिव्ह आला तर मृतदेह कुटुंबीयांना देण्यात येईल. जर पॉझिटिव्ह आला तर शासकीय नियमानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे म्हणाले की, तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील रायरी येथील 6 व धारांबेवाडीतील 3 तर वीसगाव खोऱ्यातील मानकरवाडीतील 3 करोनाबाधित रुग्णांचा यात समावेश आहे.
दरम्यान्, रायरी, मानकरवाडी, धारांबेवाडी व इतर ठिकाणच्या 23 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. त्यातील 17 जणांचे अहवाल आले असून त्यापैकी चौघे पॉझेटिव्ह आले असून 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत 6 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
विशेषबाब म्हणजे सध्या करोनाबाधित असलेले रुग्ण हे मुंबईहून गावी आलेले आहेत. तालुक्यात जवळपास 25 हजारा लोक मुंबईवरून आलेले असले तरी मागील 8 ते 10 दिवसांपूर्वी गावी आलेले लोकच क्वारंटाइन केले असतानाच करोनाबाधित आढळले असल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
4331 जणांचे विलगीकरण
भोर तालुक्यात घर (होम) आणि शाळांमध्ये विलगीकरण केलेल्यांची संख्या 4304 आहे. तर इंन्स्टीट्युशन विलगीकरण करण्यात आलेल्यांची संख्या 37 असे एकूण 4341 जणांचे विलगिकरण केले आहे. तर तालुक्यात एकूण 11 चेक पोस्ट उभारलेली असून या पुढे बाहेरुन येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार अजित पाटील व गटविकाविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
भोरच्या सर्व सीमा बंद
भोर तालुक्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत होत असलेल्या वाढीमुळे शहरात ग्रामदूत आणि शहर दूतांशिवाय बाहेरील कोणाही व्यक्तीला भोर शहरात प्रवेश दिला जाणार नसून, यासाठी भोर शहराच्या सर्व सीमा बंद केल्या असल्याची माहिती भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संदर्भात भोरचे प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी हे सर्व निर्णय घेण्यात आले आहेत. भोर शहरातील प्रत्येक प्रवेशद्वारांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक कामाची खात्री पटल्यावरच संबंधितास प्रवेश दिला जाणार असल्याचे मुख्याधिकारी थोरात यांनी सांगितले. या बैठकीवेळी तहसीलदार अजित पाटील, भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक राजू मोरे आदी अधिकारी उपस्थित होते.