व्याप्ती वाढतेय : जागाच नसल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची परवड
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – शहरातील दररोजच्या बाजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बाजारासाठी शहरात मोठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच भाजी बाजार भरत असून दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत आहे, त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची परवड होत आहे.
राजगुरुनगर शहरात दररोज दोन भाजी बाजार भारतात त्यामध्ये सकाळी नगरपरिषदेच्या आवारात, जुना मोटार स्टॅन्ड समोरील मोकळ्या जागेत दिवसभर बाजार भरतो. मात्र, जवळपास राहणारे शेतकरी त्यांचा शेतीमाल नगरपरिषदेजवळ भरणाऱ्या बाजारात आणतात, त्यामुळे ग्राहकही या बाजारात खरेदीला पसंती देतो. येथील मैदानात शेकडो स्थानिक भाजी विक्रेते बसतात त्यांना नगरपरिषदनेने जागा वाटून दिल्या असल्या तरी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या मोठी असल्याने ही जागा अपुरी पडत असल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांची गैरसोय
होत आहे.
सीसीटीव्हीच नाही
राजगुरूनगर शहरातील भाजीपाला खरेदीसाठी आणि विक्रीसाठी आलेल्या ग्राहक व्यापाऱ्यांना वाहने लावण्यासाठी जागाच नसल्याने ही वाहने रस्त्यात लावत असल्याने पादचारी व इतर नागरिकांना त्रास होत आहे. अत्यंत कमी जागेत बाजार भरत असून बाजाराच्या गर्दीत अनेक महिलांचे मौल्यवान दागिने मोबाइल व पाकीटमारी होत आहे. या भाजीबाजारात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अनेक वाईट घटना घडत असल्याने बाजारात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे झाले आहे.
…रस्ते होतात ब्लॉक
भाजीपाला बाजारासाठी आता जागाच अपुरी पडत आहे, त्यामुळे सुट्टी व सणाच्या दिवशी भाजी बाजार येथील जनावरांचा दवाखाना, खेड तहसीलदार कार्यालयात, उपविभागीय पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत रस्त्यावर बसत आहे. नगरपरिषदेच्या चारही बाजूकडून आता रस्त्यावर भाजी बाजार भारत आहे, या बाजारातूनच जाण्या-येण्याचे रस्ते असल्याने सकाळी या रस्त्यांवर खरेदी-विक्रीला गर्दी होत असल्याने सकाळी हे रस्ते ब्लॉक असतात.
विचार केल्यास…
राजगुरूनगर शहरातील दररोज भरणारा भाजीबाजार आठवडे बाजार भरणाऱ्या गढई मैदानात भरावला पाहिजे. दररोज दोनऐवजी तीन ठिकाणी भाजीबाजार सुरू करा, अशी मागणी विक्रेत्यांसह ग्राहकांनी केली आहे. तसेच वाडा रस्त्यावर तिन्हेवाडी परिसरात मोठी वर्दळ वाढल्याने या परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या खासगी मैदानावर भाजी बाजार सुरू केल्यास शहरातील रस्ते मोकळा श्वास घेतली असे पर्याय ग्राहक, विक्रेत्यांनी सुचविले आहेत.