पुणे – यजमान लॉयला हायस्कूलने लॉयला फुटबॉल कप स्पर्धेत तीन गटांतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना तिहेरी मुकुटाची संधी आहे. लॉयलाने 12, 14 आणि 16 वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाषाण येथील लॉयला हायस्कूलच्या मैदानावर या उपांत्य लढती रंगल्या. लॉयलाचे माजी विद्यार्थी आणि लॉयला हायस्कूलच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
12 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य लढतीत बिशप्स स्कूलने सेंट व्हिन्सेंट हायस्कूलवर 3-1 ने मात केली. बिशप्सची अंतिम लढत लॉयला हायस्कूलविरुद्ध होणार आहे. लॉयलाने हचिंग्ज हायस्कूलवर टायब्रेकमध्ये मात केली. चौदा वर्षांखालील गटात बिशप्स स्कूलने जे. एन. पेटिट हायस्कूलवर 3-0 ने विजय मिळवला. बिशप्स आणि लॉयलामध्ये अंतिम लढत रंगणार आहे. 16 वर्षांखालील गटाचीही अंतिम फेरी बिशप्स स्कूल आणि लॉयलामध्ये रंगणार आहे.