पुणे – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वरिष्ठ गट महिलांच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी आझम कॅम्पस मैदान सज्ज झाले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून यातील 5 सामने आझम कॅम्पस मैदानावर होणार आहेत.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. इनामदार तसेच आझम स्पोर्टस अकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी ही माहिती दिली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निकषांनुसार आझम कॅम्पसचे व्हीएम गणी स्पोर्टस पॅव्हेलियन तयार करण्यात आहे. या पातळीवरचे क्रिकेट सामने प्रथमच या मैदानावर होत आहेत.
उत्तराखंड आणि मुंबई यांच्यातील सामना 31 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. यानंतर दि. 1 नोव्हेंबरला मुंबई आणि तामिळनाडू, तर दि. 3 नोव्हेंबरला उत्तराखंड आणि चंदिगड, सहा तारखेला ओडिशा आणि रेल्वे यांच्यातील सामना होणार आहे.