मोशी येथील बास्केटबॉल मैदान बनले मद्यपींचा अड्डा

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांची होतेय गैरसोय

पिंपरी – मोशी प्राधिकरण सेक्‍टर क्रमांक 9 येथील बास्केटबॉल मैदानाची दुवस्था झाली आहे. मैदान परिसरात कचरा, मोकाट जनावरे, मद्यपींचा अड्डा व अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्‍यता आहे. याबाबत चैकशी करून येथील परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिका प्रशासनाने आजूबाजूंच्या गावांचा महापालिकेत समावेश करताना विविध सोयीसुविधा त्यांना दिल्या आहेत. मैदाने, उद्याने, जलतरण तलाव आदी गोष्टींचे नियोजन करून त्यांची उभारणी करण्यात आली आहे. परंतु करोना काळात सर्व उद्याने, मैदाने, जलतरण तलाव बंद असल्याने महापालिकेच्या क्रीडा विभागाने तसेच इतर विभागांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील उद्याने, मैदाने यांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

बहुतांश मैदानांमध्ये, उद्यानांमध्ये तसेच अरक्षित जागांवर महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा वचक नसल्या कारणाने मद्यपींनी अड्‌डे बनविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली उद्याने, मैदाने मात्र मद्यपी दारू पिण्यासाठी वापर करत आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

बास्केटबॉल मैदानात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. विद्युत दिवे तुटलेले, मोकाट कुत्रे, जनावरे, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, इमारतीची दुरवस्था, खिडक्‍यांच्या काचा फुटलेल्या, विद्युत रोहित्र धोकादायक स्थितीत असून, मैदान परिसरात मोठ मोठी झाडेझुडुपे वाढली आहेत. यामुळे बास्केटबॉल मैदान बकाल झाले आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

कारवाईची मागणी
मोशी येथील बास्केटबॉल मैदानात मद्यपींचा वावर वाढला आहे. तसेच मैदानात दारूच्या रिकाम्या बॉटल पडल्या आहेत. मैदानातील स्थावर मालमत्तेची दुरवस्था झालेली आहे. मैदान परिसरात झाडेझुडुपे मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

तसेच मद्यपींचा इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जागरूक नागरिक महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली असून या मैदानाच्या दुरवस्थेस कारणीभूत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अध्यक्ष नितीन यादव व सचिव उमेश सणस यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.