पुणे, दि. 18 -पुण्यात कॉंग्रेसने महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देत प्रभागात पक्षबांधणीच्या तयारीला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी कॉंग्रेस भवनमध्ये झाली.
पुण्यात एकेकाळी कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र आता महाविकास आघाडीमध्येही तिसऱ्या स्थानावर असलेल्या कॉंग्रेसने आता अस्तित्त्वाची लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केल्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या मागणीनुसार आगमी निवडणुकीसाठी इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची आणि पक्ष संघटनेची बांधणी करण्याला सुरूवात करावी, असा निर्णयही चर्चेअंती, सर्व सहमतीने घेण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे. या आधीही कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. तसे राज्यात पक्षश्रेष्ठींना कळवलेही होते. मात्र राज्यात युती झाल्यानंतर आणि स्थानिक पातळीवरही ती टिकून राहिल्यानंतर कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीबरोबर जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
आता जरी स्वबळावर लढण्याची इच्छा जरी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असली आणि ती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली असली तरी राज्यात जो निर्णय होईल. तो स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर मान्य करावा लागणार आहे. तोपर्यंत तरी कार्यकर्ते स्वबळाची भाषा आणि पक्षबांधणी याकडे लक्ष देतील हे नक्की!