पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील महावितरणच्या 22 हजार 244 ग्राहकांनी वीज बिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडला असून ते पेपरलेस झाले आहेत. या ग्राहकांना थेट ईमेल किंवा एसएमएसद्वारे बिल येत असून प्रत्येक बिलामध्ये 10 रुपयांची सूटही मिळत आहे.
महावितरणच्या या गो ग्रीन योजनेमधून बिलासाठी कागदाचा वापर बंद केला तरी वीजबिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपी जतन करून ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. बिल तयार झाल्यावर लगेच ई-मेल किंवा एसएमएसद्वारे प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटसह ते तत्काळ ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर चालू महिन्यावर मागील 11 महिन्यांचे असे एकून 12 महिन्यांचे बिल उपलब्ध होणार आहेत. या योजनेचे लाभ घ्यावा, असे महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे.
गो ग्रीन योजना
गो ग्रीन योजनेत शहरातील 22 हजार 244 ग्राहकांनी वीज बिलाची कॉपी न मागता केवळ एसएमएस आणि सॉफ्ट कॉपीच्या आधारे वीज बिल भरण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांची वर्षाला 120 रुपयांची बचत होणार आहे. बिल तयार झाल्यानंतर लगेच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा प्राप्त होत असल्याने ग्राहकांना तत्काळ ऑनलाइन बिल भरता येते.