मुंबई – वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याने त्यांची दिवाळी गोड साजरी होणार आहे. याबाबतची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली की, लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बोनस जाहीर केल्यानंतर संप मागे घेणाऱ्या सर्व संघटनांचे आभार! वीज कंपन्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! #HappyDeepavali pic.twitter.com/ymaS7RyKBF
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) November 14, 2020
वीज कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या बोनसची रक्कम ही गेल्या वर्षी इतकी असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 15 हजार, तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी 9 हजार रुपये बोनस म्हणून मिळाले होते. त्याचप्रमाणे यंदाही बोनस मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या 368 अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून नियुक्तीची वाट पाहणाऱ्या 368 जणांची दिवाळीही गोड झाली आहे.