नगर -जनतेच्या आग्रहास्तव राजकारणात येण्याचे जाहीर करत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून निवडणूक लढवणार असल्याचे मुंडे यांच्या पत्नी करुणा यांनी जाहीर केले. त्यांनी शिवशक्ती या राजकीय पक्षाच्या स्थापनेचीही घोषणा यावेळी केली.
येथे पत्रकार परिषदेत करुणा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे. मंत्र्यांचे कोट्यवधींचे घोटाळे उघड होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोपात मश्गुल आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यभरात दौरे करून 30 तारखेला नगरमध्ये मेळावा घेऊन निवडणुकीचा बिगुल वाजविणार असल्याचे सांगितले.
मुंडे म्हणाल्या की, 90 टक्के निर्दोष जेलमध्ये आहेत. पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो. ड्रग्ज प्रकरण उजेडात आणणारे समीर वानखडे यांची जात कोणती आहे, यावरून गदारोळ उठला आहे. मला इतर पक्षांकडून ऑफर असतानाही मी त्या नाकारल्या.
महाराष्ट्रात दौरे करून लोकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तुळजापूर येथून शुभारंभ करणार असून, 30 जानेवारीला नगरमध्ये मोठा मेळावा घेणार आहे. यावेळी भाऊसाहेब शिंदे, रवी गवळी, दादासाहेब जावळे, मुरलीधर धात्रक, भारत भोसले आदी उपस्थित होते.