मुंबई – मुंबईत करोना पुन्हा फैलावू लागल्याची लक्षणे दिसून आली आहेत. मुंबईत गेल्या संपुर्ण महिनाभरात जितके करोना रूग्ण आढळून आले होते त्याच्या 28 टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांतच नोंदवले गेल्याने पुन्हा धास्तीचे वातावरण तयार होत आहे.
तशातच येत्या काही दिवसांत मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू होत आहे त्यामुळे चिंतेत भरच पडली आहे. मुंबईत आता वाढीव रूग्णांवर उपचार करण्यासाठी जंबो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून स्वच्छतेच्या बाबतीतील निर्बंध कठोरपणे लागू केले जाणार आहेत.
मुंबईत गेल्या सहा दिवसांत करोनाचे एकूण 2570 रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात एकूण 9147 रूग्ण आढळून आले होते त्या संख्येच्या तुलनेत या महिन्यातील पहिल्या सहा दिवसांत आढळून आलेल्या रूग्णांची संख्या 28.9 टक्के इतकी आहे. तसेच गेल्या सहा दिवसांत करोनामुळे मुंबईत एकूण 21 जण दगावले आहेत.
ऑगस्ट मध्ये एकूण 157 जण दगावले होते. मुंबईत करोनामुळे सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या आता 44 झाली आहे. करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने आम्हाला पुढील महिना महत्वाचा आहे असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी गावी गेलेले लोक जेव्हा मुंबईत परत येतील त्यानंतरचे पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असतील असेही त्यांनी नमूद केले.