लॉकडाऊनमध्ये युवक शोधताहेत इतिहासाच्या पाऊलखुणा

रहिमतपूर  – लॉकडाऊनमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या आहे. या वेळेचा सदुपयोग करत कोरेगाव तालुक्‍यातील तारगाव, काळोशी, मोहितेवाडी, दुर्गळवाडी येथील शिवप्रेमी युवक इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत आहेत. कराड तालुक्‍यातील वसंतगडाच्या संवर्धनासाठी हे युवक झटत आहेत.
काळोशीतील युवकांनी “इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा व्हॉटस्‌ऍप ग्रुप तयार केला आहे.

या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धनाच्या कामात सहभागी होण्याचे सर्वांनी ठरवले. काही दिवसांपूर्वी दातेगडाच्या संवर्धनाच्या कामात या युवकांनी भाग घेतला होता. स्वराज्याचे पराक्रमी सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वास्तव्य असलेल्या तळबीड येथील वसंतगडाच्या संवर्धनाचे काम या युवकांनी हाती घेतले आहे. या युवकांनी दोन वेळा या गडावर मोहीम केली. त्यामध्ये गडावर पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष शोधण्यात आले. त्यावर वाढलेली झाडेझुडपे बाजूला करण्यात आली. मातीचे ढिगारे उपसण्याचे काम या युवकांनी हाती घेतले आहे.

गडावरील चंद्रसेन महाराज मंदिरात राहण्याची सोय होत आहे. पिण्यासाठी तेथील कृष्णा तळ्याचे चवदार पाणी आहे. या युवकांच्या कामाची माहिती लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे; परंतु या युवकांना आर्थिक मदतीची आवश्‍यकता आहे. आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यास जिल्ह्यातील युवकांनी सहकार्य करावे. इच्छुकांनी 9673762468 या मोबाइल क्रमांकाच्या गुगल पे अकाउंटवर आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन शुभम आठवे, रोहन जवळ यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.