अंकोला : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सध्या धुराळा उडताना दिसत आहे. त्यातच भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मतदारांना एक आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
कर्नाटकात आयोजित जाहीर सभेत “काँग्रेसमध्ये ‘शिवराळ संस्कृती’ असून कर्नाटकच्या जनतेने त्यांना धडा शिकवण्यासाठी मतदानयंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करा, असे आवाहन मोदी यांनी केले. यावेळी बोलताना,‘मी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यंत्रणा मोडित काढल्यामुळे त्या पक्षाचे नेते माझा तिरस्कार करतात आणि माझ्याबाबत अपशब्द वापरतात. काँग्रेस निवडणुकीत एकतर त्यांच्या निवृत्त होत असलेल्या नेत्यांच्या नावे मते मागते किंवा दुसरा मार्ग म्हणजे मोदींना शिव्या दिल्या जातात. कर्नाटकातील जनता ही शिवराळ संस्कृती खपवून घेईल का, कर्नाटकची जनता अपशब्द वापरणाऱ्यांना माफ करेल का, आता तुम्ही काय कराल, तुम्ही त्यांना शिक्षा कराल का, तुम्ही जेव्हा मतदानकक्षात जाल, तेव्हा यंत्रावरील बटण दाबताना जय बजरंगबली म्हणा आणि त्यांना शिक्षा करा,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी मतदारांना आवाहन केले आहे.
काँग्रेसचे संपूर्ण राजकारण हे फोडा आणि राज्य करा याच धोरणावर अवलंबून असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलकी येथील प्रचारसभेत केली. भारताच्या लोकशाहीबाबत जगभरात कौतुकाने आणि आदराने बोलले जाते. मात्र काँग्रेस पक्ष देशाला बदनाम करत फिरत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.
काँग्रसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर, संपूर्ण राज्यभरात गुरुवारी ‘हनुमान चालिसा’ पठणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे या संघटनेने जाहीर केले आहे. दरम्यान, काँग्रेसने हे आश्वासन मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यासाठी दिले असल्याचे कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी म्हटले आहे.