जयपुर- राजस्थानच्या जयपुर ग्रामीण लोकसभा मतदार संघात दोन माजी ऑलिम्पीक खेळाडूंमध्ये रंगतदार लढत पहायला मिळत आहे. भाजपने या मतदार संघात विद्यमान केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड या माजी ऑलिम्पीक खेळाडूला उमेदवारी दिली आहे तर कॉंग्रेसनेही त्यांना तोडीसतोड लढत देण्यासाठी कृष्णा पुनीया यांना उमेदवारी दिली आहे.
कृष्णा पुनीया याहीं ऑलिम्पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या धावपटू आहेत. त्यांनी तीन वेळा ऑलिम्पीक मध्ये भाग घेतला आहे तसेच त्यांनी सन 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. सरकारने त्यांचा पद्मश्री किताब देऊनही गौरव केला आहे. त्यामुळे या तुल्यबळ लढतीत कोण विजयी होणार या विषयी कमालचे औत्स्युक्य निर्माण झाले आहे.
कृष्णा पुनीया या सदलपुर मतदार संघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्या या पार्श्वभूमीवर राजवर्धन राठोड यांना कडवी लढत देतील असा कॉंग्रेसचा विश्वास आहे. राजवर्धन राठोड यांनी अथेन्स ऑलिम्पीक स्पर्धेत नेमबाजीचे रौप्य पदक मिळवले आहे तर सन 2002 साली मॅचेस्टर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. ते लष्करात कर्नल पदावर कार्यरत होते. सन 2013 साली त्यांनी लष्करातून निवृत्ती घेऊन भाजपत प्रवेश केला होता. पहिल्याच निवडणुकीत ते खासदार आणि मंत्रीही झाले.