नवी दिल्ली – दिल्लीच्या किरकोळ कांदा बाजारातील भाव गेल्या आठवडाभरात 45 टक्क्यांनी वाढले असून तेथील सध्याचा कांद्याचा दर 80 रूपये किलोवर गेला आहे. गेल्या महिन्यात कांद्याचा तेथील दर 55 रूपये प्रतिकिलो होता. महाराष्ट्रासारख्या राज्यातून येथे मोठ्याप्रमाणावर कांद्याची आवक होते. पण पावसामुळे तेथील आवक मंदावल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे असे येथील व्यापारी सांगतात.
गेल्या वर्षी नोव्हंबर महिन्यात दिल्लीत कांद्याचे दर तीस ते पस्तीस रूपये प्रतिकिलो असे होते. या नोव्हेंबर महिन्यात त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. दिल्लीतील कांद्याचे दर हा राजकीय संवेदनशीलतेचाहीं विषय आहे.
या संबंधात बोलताना ग्राहक व्यवहार व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की येत्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्तानातून कांद्याची मोठ्या प्रमाणात आयात सुरू झाल्यानंतर हे दर कमी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत सध्या मदर डेअरीच्या केंद्राद्वारे 24 रूपये 90 पैसे किलो दराने ग्राहकांना कांदा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पण मागणीच्या प्रमाणात त्याचा पुरवठा कमी आहे.त्यासाठी बफर स्टॉकचा वापर केला जात आहे.