वॉशिंग्टन – इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या खोरसान गटाकडून गेल्या वर्षी भारतात मोठ्या स्वरूपाचा आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न झाला होता पण तो फसला अशी माहिती अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी गटाकडून देण्यात आली. पण त्याविषयीचा अधिक तपशील मात्र त्यांनी जाहीर केलेला नाही. हा गट दक्षिण अशियात कार्यरत आहे. इसिस-के या नावाने हा गट परिचित आहे.
त्याच्या कारवाया या अमेरिकेसाठीही चिंताजनक ठरल्या आहेत.त्यांनी आता अफगाणिस्तानच्या बाहेरही हल्ल्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. असाच एक प्रयत्न त्यांनी गेल्या वर्षी भारतात केला होता अशी माहिती दहशतवाद विरोधी केंद्राचे हंगामी संचालक रसेल ट्रॅव्हर्स यांनी सांगितली.
हा गट अमेरिकेच्या भूमीवरही दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीहीं त्यांनी दिली. दोन वर्षांपुर्वी या गटाने न्युयॉर्क येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण तो एफबीआयने हाणून पाडला होता. त्यांनीच स्टॉकहोम येथे 2017 मध्ये दहशतवादी हल्ला केला त्यात पाच जण ठार झाले.