इस्लामाबाद – इम्रान खान यांना येथील तुरुंगात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याचा आरोप पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाच्यावतीने आणि त्यांच्या वकिलांच्यावतीने करण्यात आला आहे. इम्रान खान यांना त्यांच्या वकिलांची भेट घेऊ दिली जात नाही आहे.
तसेच अटक तुरुंगात इम्रान यांच्या वकिलांनाही प्रवेश दिला जात नाही आहे. इम्रान खान यांना कपडे, खाद्यपदार्थ आणि अन्य आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठीही भेट नाकारली जात असल्याचेही “पीटीआय’च्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
तसेच पॉवर ऑफ ऍटर्नी आणि विविध कायदेशीर प्रक्रियांच्या कागदपत्रांवर इम्रान खान यांच्या स्वाक्षऱ्या हव्या असल्यानेही त्यांची आणि वकिलांची भेट आवश्यक आहे. मात्र वकिलांना त्यांची भेट नाकारण्यात आली.
“बी ग्रेड’ कैदी म्हणून इम्रान खान यांना पुस्तके, वर्तमानपत्रे , टेबल, खुर्ची, टिव्ही, चटई, कपडे आणि तुरुंगातील अन्नपदार्थ मिळणे अपेक्षित आहे. याशिवाय बाथरूमची सुविधाही मिळणे अपेक्षित आहे, असे इम्रान यांच्या वकिलांनी माध्यमांना सांगितले.
इम्रान खान यांना अदियाला तुरुंगात ठेवण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले असतानाही त्यांना येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांना अदियाला तुरुंगात हलवण्याबाबत तुरुंग प्रशासन काहीच बोलत नाहीत आहे.
तुरुंग प्रशासनाकडून अदियाला तुरुंगात नेले जाण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे आता “पीटीआय’च्या कार्यकर्त्यांनी या मुद्यावरून एक याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.