इस्लामाबाद – अटक तुरुंगाच्या अधिक्षकांनी आपल्याला मुलांशी फोनवरून बोलू दिले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमान केल्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी विशेष न्यायालयात दाखल केली आहे.
सायफर प्रकरणी इम्रान खान यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत 13 सप्टेंबर पर्यंत आहे. गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने इम्रान खान यांना त्यांच्या कासिम आणि सुलेमान या मुलांशी फोनवरून बोलू देण्याची परवानगी दिली होती. मात्र तुरुंगाच्या अधिक्षकांनी त्यांना ही परवानगी नाकारली.
त्यामुळे अधिक्षकांविरोधात न्यायालयाचा अवमाना केल्याचा आरोप करणारी याचिका इम्रान खान यानी विशेष न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तुरुंग अधिक्षकांना नोटीस बजावून या संबंधीचा अहवाल मागवला आहे.