IMP NEWS | 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य व शारीरिक शिक्षण परीक्षेबाबत सूचना जारी

पुणे – राज्यातील इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा घेण्याबाबत राज्य मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. येत्या 10 जूनपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर या परीक्षांचे आयोजन करुन त्याचे मूल्यांकन विभागीय मंडळाकडे सादर करावे लागणार आहे.

राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळपत्रक जाहीर केलेले आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव असताना आरोग्य व शारिरीक विषयाच्या परीक्षेबाबतही विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या संभ्रम निर्माण झाला होता. या परीक्षा कधी व कशा घ्यायच्या, त्यांचे मूल्यांकन कसे करायचे याबाबत शिक्षकांसमोरही अनेक प्रश्‍न उभे राहिले होते.

राज्यमंडळाकडून तज्ञांमार्फत युट्युबवर प्रशिक्षणही उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र या प्रशिक्षणाच्या दरम्यान शिक्षकांना प्रश्‍न विचारण्याची संधीच उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती, असे म्हणत शिक्षकांकडून संतापही व्यक्त करण्यात आला होता.

राज्य मंडळाकडून अखेर उशिरा का होईना पण आरोग्य व शारिरीक विषयाच्या परीक्षेबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेल्या आहेत. त्या राज्यातील विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. दहावीसाठी दोन्ही सत्रात परीक्षा न घेता एकाचे म्हणजे द्वितीय सत्रात परीक्षा घ्यावी लागणार आहे.

प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी 50 गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या 100 गुणांपैकी प्रचलित पध्दतीनुसार श्रेणी देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखन कार्य पूर्ण करुन घ्यावे लागणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी 25 व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 25 अशा 50 गुणांची परीक्षा होणार आहे. आरोग्याधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शारिरीक क्षमतेवर आधारित कोणतीह एक क्षमता, कोणत्याही एका सांघिक खेळाची निवड करुन क्रीडा कौशल्य सादरीकरण करणे, योग व प्राणायम, दोन आसने विविध क्रीडा स्पर्धेतील सहभाग व तासिका उपस्थिती, पुस्तक लेखन कार्य यावर परीक्षा घ्यावी लागणार आहे.

कमीक कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करुन शारिरीक अंतर ठेवून गटागटाने प्रात्याक्षिक परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरुपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्‍य होईल ते साहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.