अनधिकृत आठवडे बाजार अखेर ‘उठणार’

पालिका आयुक्तांचे आदेश : नियम बदलण्याची पणन महामंडळास विनंती

पुणे – मान्यता न घेताच पालिकेच्या जागांमध्ये अनधिकृतपणे भरवले जाणारे आठवडे बाजार अखेर उठणार आहेत. अतिक्रमणे करून भरवल्या जाणाऱ्या बाजारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

आठवडे बाजारांबाबत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय आठवडे बाजारांबाबत सुधारित नियमावली करण्याचा निर्णय झाला असून, त्यासाठी याबाबतचे निवेदनही पणन मंडळास दिले जाणार आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या मान्यतेने आठवडे बाजाराच्या नियमावलीत बदल केला जाणार आहे.

शहरात गेल्या काही वर्षांत आठवडे बाजारांचे पेव फुटले आहे. शेतकऱ्यांकडून थेट माल विक्री केला जात असल्याचे भासवून पणन मंडळाची मान्यता न घेता हे बाजार शहरातील रस्त्यांवर जात आहे. प्रत्यक्षात शासकीय जागेत हे बाजार भरवणे आवश्‍यक असताना मान्यता न घेता तसेच शुल्क न देता भरवले जात आहेत. या बाजारांमुळे वाहतूक कोंडी होत असून, अशा ठिकाणी पादचाऱ्यांना अपघातांचाही सामना करावा लागत आहे. हे बाजार भरवणाऱ्या संयोजक विक्रीसाठी येणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून 600 रुपयांचे शुल्कही वसूल केले जाते. तसेच विक्रीसाठी येणारे शेतकरी नसून शहरातील भाजी विक्रेत्यांचे नातेवाईक आहेत. या बाजारांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने अतिक्रमण निर्मूलन विभागाने जाहीर निवेदन देत हे बाजार आठ दिवसांच्या बंद करावेत, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

मात्र, या बाजाराच्या संयोजकांनी आयुक्तांची भेट घेत ही कारवाई थांबवली होती. तसेच पणनमंडळाने आम्हाला मान्यता दिली असून, त्यांच्याशी चर्चा करूनच कारवाई करावी अशी विनंती केली होती. त्यानंतर आयुक्तांनी नुकतीच ही बैठक घेतली. त्यासाठी पणन विभागाचे सुनील पवार हे उपस्थित होते.

या बैठकीत अतिक्रमण निर्मूलन विभागाने समस्यांचा पाढाच वाचला. त्यात हे संयोजक महापालिकेची परवानगी घेत नाहीत. रस्त्यावरच बाजार भरवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, शेतकऱ्यांऐवजी स्थानिकांनी भाजी विक्री करत असल्याचे सांगण्यात आले.
बाजारांबाबत सुधारित नियमावली करण्याची मागणी केली. त्यास जागांसाठी नियमानुसार शुल्क भरणे तसेच शेतकऱ्यांची खातरजमा करणे अशा प्रमुख मागण्या महापालिकेने केल्या. तसेच अनधिकृतपणे भरणाऱ्या बाजारांवर पालिका कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

हे आठवडे बाजार रस्त्यावर तसेच वर्दळीच्या ठिकाणी भरवण्यात येत आहेत. त्यामुळे अशा बाजारांवर महापालिकेने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागास देण्यात येणार असून, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
– शेखर गायकवाड, आयुक्‍त, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.