स्वतःस आयोजक भासविण्याचा आमदार बनसोडे यांचा केविलवाणा प्रयत्न
पिंपरी – दि. 18 ते 22 मार्च या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात होणारी राज्यस्तरीय शासनाची कबड्डी स्पर्धा शहर राष्ट्रवादीकडून “हायजॅक’ करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या नावावरून आकांडतांडव करणाऱ्या राष्ट्रवादीने शहराच्या महापौरांचा साधा उल्लेखही केला नाही. तर पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्तिगत नाव टाकत आपणच आयोजक असल्याचे केविलवाणा प्रयत्न केल्यामुळे हा संपूर्ण प्रकार शासनाच्या क्रीडा विभागाचा की शहर राष्ट्रवादीचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
शहर राष्ट्रवादीकडून स्पर्धा “हायजॅक’
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दरवर्षी राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान पिंपरी-चिंचवड शहराला मिळाला आहे. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनसह पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटी या स्पर्धेचे संयोजक आहे. पालकमंत्री अध्यक्ष तर स्थानिक महापौरांसह आमदार व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा या संयोजन समितीमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरीच्या आमदारांनी आपण स्वत: आयोजक असल्याचे प्रसिद्धीपत्रक पत्रकारांना वाटप केले.
विशेष म्हणजे क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या साक्षीने हा प्रकार त्यांनी केला. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात महापौर या संबंधित समितीच्या सदस्या असताना त्यांचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे ही स्पर्धा राज्य शासनाची की स्थानिक राष्ट्रवादीची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पालकमंत्र्यांचे नाव महापालिकेने न छापल्यास सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी मंत्र्यासमक्ष केलेल्या या प्रकारानंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व महापौर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
488 स्पर्धकांचा समावेश
पिंपरी येथील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दि. 18 ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. स्पर्धेत 488 खेळाडूंनी सहभाग नोंदविल्याची माहिती क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेची माहिती देताना तटकरे म्हणाल्या, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही पहिलीच स्पर्धा होत आहे. पहिल्याच स्पर्धेच्या संयोजनाचा मान पिंपरी-चिंचवड शहराला मिळाला आहे. क्रीडा व युवक संचलनालयाच्या नियंत्रणाखाली ही स्पर्धा होणार असून कोणाचाही स्थानिक पातळीवर यामध्ये हस्तक्षेप होणार नाही. 23 तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. 90 हजार रुपयांची बक्षिसे विजेत्या खेळाडूंना दिली जाणार असून पंचांसह खेळाडूंचा जाण्या-येण्याचा व राहण्याचा, भोजनाचा खर्च केला जाणार आहे.