पॅरिस – पोलंडच्या इगा स्विटेकने रशियन वंशाच्या मात्र, अमेरिकेकडून खेळत असलेल्या सोफिया केनिनचा पराभव करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
केवळ 19 वर्षांच्या स्विटेकने अंतिम सामन्यात 21 वर्षीय केनिनचा 6-4, 6-1 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
स्विटेकने आजवरच्या कारकिर्दीत एकदाही मोठी स्पर्धा जिंकलेली नसून केनिने मात्र, ऑस्ट्रेलियन ओपनचे यंदा विजेतेपद पटकावले आहे. अननुभवी असूनही स्विटेकने अत्यंत नियोजनबद्ध खेळ करत केनिनचे आव्हान मोडून काढले.
जोकोविच-नदालची विजेतेपदाची लढत
सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच व स्पेनचा लाल मातीचा बादशहा राफेल नदाल यांच्यात पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे.
उपांत्य फेरीत जोकोविचने युनानच्या स्टेफानोस सितसिपासचा 6-3, 6-2, 5-7, 4-6, 6-1 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. नदालने उपांत्य लढतीत अर्जेन्टिनाच्या डिएगो श्वार्त्झमनवर 6-3, 6-3, 7-6 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला.