जळगाव – गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच आज शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी खडसे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांबाबत महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांबाबत प्रतिक्रिया देताना पाटील यांनी, ‘ते सध्या कोणाच्या संपर्कात आहेत हे माहिती नाही, मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे.’ असं वक्तव्य केलं. ते अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना बोलत होते.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यानंतर काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे मुंबई येथे दाखल झाले होते. येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व खडसे यांची भेट होईल व यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र पवार-खडसे यांच्यात अशी कोणतीही भेट झाली नाही.
अशातच गुलाबराव पाटील यांनी, ‘खडसे कोणाच्या संपर्कात आहेत हे माहीत नाही, मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’ असं वक्तव्य केल्याने खडसे शिवसेनेमध्ये तर प्रवेश करणार नाहीत ना? अशी नवी चर्चा सुरु झाली आहे.