पणजी – 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘एंडलेस बॉर्डर्स’ (Endless borders) या अब्बास अमिनी यांच्या चित्रपटाने पटकावला. काल या महोत्सवातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. (IFFI)
अन्य महत्वाच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमांडारेव्ह ‘ब्लागाज लेसन्स’या चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर एंडलेस बॉर्डर्स साठी पौरिया रहीमी सॅमला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा (पुरुष) रजत मयूर पुरस्कार. मिळाला. पार्टी ऑफ फूल्स साठी मेलानिया थियरीला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा (महिला) सिल्व्हर पिकॉक पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते आणि लेखक ऋषभ शेट्टी (Rishabha Shetty) यांना ‘कांतारा’ चित्रपटासाठीच्या अजोड कामगिरीसाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर रेगर आझाद काया यांना व्हेन द सीडलिंग्ज ग्रो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. तर अँथनी चेन दिग्दर्शित ड्रिफ्ट चित्रपटाला प्रतिष्ठेच्या आयसीएफ-युनिसेफ गांधी पुरस्काराने गौरवण्यात आले.
मायकेल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने आज गौरवण्यात आले.डग्लस यांनी त्यांची जोडीदार अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती कॅथरीन झेटा जोन्स आणि त्यांचा मुलगा आणि अभिनेता डिलन डग्लस यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात 50 वर्षांहून अधिक काळ सक्रिय असलेले मायकेल डग्लस यांना 2 ऑस्कर, 5 गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स, एक प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि इतर असंख्य मानसन्मान मिळाले आहेत. वॉल स्ट्रीटमधील गॉर्डन गेक्कोच्या अकादमी पुरस्कार विजेत्या भूमिकेपासून ते फॅटल अट्रॅक्शन, द अमेरिकन प्रेसिडेंट, बेसिक इन्स्टिंक्ट, ट्रॅफिक आणि रोमान्सिंग द स्टोन यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांच्या दमदार कामगिरीपर्यंतचा सिनेमावरील त्यांचा प्रभाव दिसून येतो.
‘कांतारा’साठी विशेष ज्युरी पुरस्काराने ऋषभ शेट्टी सन्मानित
प्रतिष्ठित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते आणि लेखक ऋषभ शेट्टी यांना ‘कांतारा’ चित्रपटासाठीच्या अजोड कामगिरीसाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भारतीय सिनेमाच्या जागतिक विस्ताराचा संदर्भ देताना भारतीय सिनेमा खरोखरच वैश्विक झाला आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या असाधारण आशयगर्भ कामाचा हा थेट परिणाम आहे, असे शेट्टी म्हणाले. रौप्य मयूर पदक, 15 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेल्या पुरस्काराने शेट्टी यांना गौरवण्यात आले.