Vijay Sethupathi – गोव्यातील कला अकादमी येथे 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) (2023 International Film Festival of India) एका ‘इन- कन्व्हर्सेशन’ संवाद सत्रादरम्यान, प्रख्यात अभिनेते विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांनी ज्येष्ठ अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्याबरोबर चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या प्रवासातील अनुभव आणि विचार सामायिक केले.
विजय सेतुपती हे भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली मुख्य भूमिका सीनू रामासामी यांच्या थेनमेरकु पारुवकत्रूमध्ये होती ज्याने तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
अभिनय कौशल्याच्या प्रवासाबाबत विजय सेतुपती म्हणाले, मला माहित आहे की मला माहित नाही. भारतीय चित्रपट उद्योगातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून, त्यांनी स्पष्ट केले की भूमिकांसाठी तयारी करताना ते चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांबरोबर चर्चा आणि तर्क-वितर्कातून शिकत गेले.
विविध भूमिकांमधील आपल्या प्रतिमेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सेतुपती म्हणाले की ‘चित्रपटातील प्रमुख कलाकारापेक्षा प्रेक्षकच कथा आणि व्यक्तिरेखांकडे आकर्षित होतात. अभिनयाबद्दल विचारले असता त्यांनी मनाला स्वातंत्र्य देण्याचे आणि “प्रवाहासोबत जाण्यावर’ त्यांनी भर दिला. अभिनयाचे कोणतेही वेगळे सूत्र नाही असे सांगताना कलाकारांनी व्यक्तिरेखा पूर्णपणे जगण्याची गरज अधोरेखित केली.
राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिलेल्या सुपर डिलक्स या चित्रपटातील एका ट्रान्सजेंडरच्या व्यक्तिरेखेबाबत सेतुपती यांनी अधोरेखित केले की त्यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तींना सामोरे जावे लागत असलेल्या वास्तविक जीवनातील संघर्षांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी सांगितले.
उपस्थितांशी संवाद साधताना, त्यांनी इथे टिकून राहण्यासाठी शिकण्याची वृत्ती जिवंत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
खलनायकाच्या भूमिकेच्या निवडीबद्दल विचारले असता सेतुपती यांनी विशिष्ट भूमिकांपुरते मर्यादित न राहण्याची इच्छा व्यक्त केली. पटकथेच्या आधारे विविध भूमिकांची चाचपणी करण्याचे स्वातंत्र्य असायला हवे यावर त्यांनी भर दिला.