न्यूयॉर्क : करोना महामारी इतक्या लवकर संपणार नसली तरी आपण योग्य वेळी योग्य ती पावलं उचलली तर करोनाची दुसरी लाट रोखू शकतो असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
जागतिक स्तरावर अद्यापही आरोग्य सेवा विस्कळीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. खासकरुन गरीब देशांमध्ये लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण सुविधा उपलब्ध नसल्याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एकीकडे श्रीमंत देशांमधील करोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट होत असताना आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियामधील काही देशांमध्ये अद्यापही संख्या वाढत असल्यावरुनही चिंता व्यक्त केली आहे.
आपल्याला अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे. खूप काम करायचं आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे. जर आपण योग्य पावलं उचलली तर करोनची दुसरी लाट रोखू शकतो असा विश्वास टेड्रोस यांनी व्यक्त केला आहे.
करोनामुळे निर्माण होणारे इतर गंभीर आजार आणि मृत्यूचा लहान मुलांना तुलनेने कमी धोका आहे. पण इतर रोगांचा जास्त धोका असू शकतो ज्यास लसीद्वारे रोखता येऊ शकते, अशी महिती टेड्रोस यांनी दिली आहे. योग्य वेळी लसीकरण न केल्याने जगभरातील जवळपास १ कोटी ३० लाख लोकांना पोलिओ, कॉलरा, कावीळ, गोवरसारख्या आजारांना सामोरं जावं लागत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
करोनामुळे देशांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून वाहतुकदेखील बंद आहे. यामुळे जवळपास २१ देशांमध्ये इतर आजारांच्या लसींची कमतरता निर्माण झाली असल्याचं ट्रेड्रोस यांनी सांगितलं आहे. आफ्रिकेत मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. हे असे होता कामा नये. आम्ही मदत करण्यासाठी काही देशांच्या संपर्कात आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. करोनाचा परिणाम मलेरियासंबंधी आरोग्य सेवेवर झाला असल्याचे ते म्हणाले आहेत.