राजगुरुनगर – सामाजिक हित जोपासत येथील राजगुरुनगर सहकारी बॅंकेने 12 लाख 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. बॅंकेच्या बाजारपेठ येथील मुख्यालयात सोमवारी (दि. 27) खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांच्याकडे अध्यक्ष गणेश थिगळे, उपाध्यक्ष अरुण थिगळे व संचालक मंडळाने हा धनादेश सुपूर्त केला. याशिवाय बॅंकेने शहरात गरजू, गरीब नागरीकांना मोफत जेवण व्यवस्था करणाऱ्या रोटरी क्लब, हुतात्मा राजगुरू फौंडेशन व बजरंग दला यांना प्रत्येकी 11 हजार रुपयांची मदत दिली.
करोना विषाणू या महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी राजगुरुनगर बॅंकेच्या 280 अधिकारी, कर्मचारी यांनी मिळून आपापले 3 दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देऊ केले आहे. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचे हे तीन दिवसांचे वेतन 6 लाख 21 हजार रुपये व राजगुरूनगर सहकारी बॅंकेने तेवढीच म्हणजे 6 लाख 30 हजार रुपये त्यात टाकून 12 लाख 51 हजार रुपये निधी दिला आहे.
बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, उपाध्यक्ष अरुण थिगळे, संचालक दिनेश ओसवाल, विजयाताई शिंदे, हेमलता टाकळकर, राजेंद्र सांडभोर, धंनजय कहाणे, राहुल तांबे पाटील, परेश खांगटे, सतीश नाईकरे, प्रभारी व्यवस्थापक शांताराम वाकचौरे, उपव्यवस्थापक अमृत टाकळकर, दिलिप मलघे यांच्यासह बॅंक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज्या ज्या वेळी सामाजिक संकट अथवा आपत्ती उभी राहते त्या वेळी राजगुरुनगर सहकारी बॅंक मदतीसाठी अग्रभागी असल्याचा इतिहास यापुढेही जपला जाईल, असे अध्यक्ष गणेश थिगळे यावेळी बोलताना म्हणाले. उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी सर्वांचे आभार मानले.