जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३६ वर; ५८ जण निगेटिव्ह तर ८६ जण दाखल
सातारा – फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा करोनाबाधित युवक पुण्यातून फलटणला आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ३६ झाली आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील ५८ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर ८६ संशयितांना विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
पुणे येथून प्रवास करुन आलेल्या २८ वर्षीय युवकाला दि. २५ एप्रिल रोजी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19) करोनाबाधित असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या रुग्णावर पुढील उपचार सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात आता ३६ रुग्ण करोनाबाधित असून आतापर्यंत ५ रुग्ण (कोविड १९) मुक्त होऊन रुग्णालयातून घरी सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ६, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ६, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील ४४, फलटण येथील २ अशा एकूण ५८ संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे. तसेच २७ एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २१, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात ५७, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात ८ अशा एकूण ८६ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.