नवी दिल्ली : सध्या देशासह जागतिक स्तरावर सर्वांचे लक्ष हे भारताच्या ऐतिहासिक अशा चंद्र मोहिमेकडे लागले आहे. चांद्रयान-३ हे पृष्ठभागावर २३ ऑगस्ट रोजी उतरणार आहे. दरम्यान चांद्रयान-३ च्या लँडिंगमध्ये अडचण आल्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. या प्लॅननुसार लँडिंगच्या वेळी काही अडचण आली तर इस्रो चांद्रयानाच्या लँडिंगची वेळ बदलू शकते.
इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी याविषयी माहिती दिली आहे. २३ ऑगस्टच्या पूर्वनियोजित तारखेला सॉफ्ट लँडिंगमध्ये अडचण आल्यास ही प्रक्रियाही 2७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे (इस्रो) संचालक देसाई यांनी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगच्या पुढील योजनेची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
‘चांद्रयान-३ हे उद्या म्हणजेच २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी लँडर मॉड्यूलची हेल्थ आणि चंद्रावरील स्थिती पाहून परिस्थिती लँडिंगसाठी योग्य आहे की नाही याचा निर्णय घेऊ. जर परिस्थिती आपल्या बाजूने नसेल तर आम्ही २७ ऑगस्टला चंद्रावर मॉड्यूल उतरवू. मात्र कोणतीही अडचण आली नाही, तर आपण २३ ऑगस्टला मॉड्यूल चंद्रावर उतरवू शकू असेही त्यांनी सांगितले.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी चांद्रयान ३ ची स्थिती आणि इस्रोच्या तयारीबद्दलची माहिती त्यांना दिली.