नवी दिल्ली : भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 2001 साली रिलीज झालेला ‘गदर’ चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर गदरचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अवघ्या 10 दिवसांत गदर 2 चित्रपटाने 300 रुपयांची कमाई केली आहे. मात्र अभिनयासह राजकारणात सक्रिय असणाऱ्या सनी देओलने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सनी देओलने जाहीर केले आहे.
याबाबत सनी देओल म्हणाले, “एक अभिनेता म्हणून काम करणं हीच माझी आता निवडणूक असणार आहे. अभिनेता म्हणून असलेली ओळखच मला प्रिय आहे. एक अभिनेता म्हणून देशाची सेवा करावी, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही एकच काम करु शकता. एकत्र अनेक कामं करू शकत नाही. मी ज्या विचाराने राजकारणात प्रवेश केला होता, ते काम मी एक अभिनेता म्हणून देखील करु शकतो. मी एक अभिनेता म्हणून सर्वकाही करु शकतो. मी यापुढे एक अभिनेता म्हणून देशाची सेवा करणार आहे.”
पुढे तो म्हणाला, “राजकारणात असताना एखादा शब्द दिला आणि ते पूर्ण होऊ शकले नाही. तर ते माझ्या मनाला अजिबात पटत नाही. मी तसे करू इच्छित नाही. संसदेत गेल्यावर पाहतो की, देश चालवणारे लोक इथे बसलेले आहेत, सर्व पक्षांचे नेते इथे बसलेले आहेत. इतरांशी एखाद्या वर्तणुकीची अपेक्षा करताना आपला व्यवहार कसा आहे, हे पाहिले पाहिजे. जेव्हा मी हे पाहतो तेव्हा मला वाटते की, मी असा नाही. दुसरीकडे कुठेतरी गेलेले बरे. मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही.” असे त्याने यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अभिनेता सनी देओलने आपला राजकीय प्रवास 2019 मध्ये सुरू केला. सनी देओलने 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाला. मात्र, आता आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय सनी देओलने घेतला आहे.