‘माझं गाव करोनामुक्त’ हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?”; भाजपचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील सर्वच यंत्रणांचे हाल करून सोडले आहेत. मात्र  गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग मंदावत असून थोडासा दिलासा मिळत आहे. पण, अजूनही दैनंदिन रुग्णसंख्येत दिलासादायक अशी घट झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर भाजपाने काही मुद्द्यांवर  मुख्यमंत्र्यांना थेट सहा सवाल केले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टोला लगावला. केशव उपाध्ये यांनी कोकणातील चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीपासून ते दहावी-बारावीच्या परीक्षा आणि लसीकरणापर्यंत विविध मुद्दे उपस्थित करत काही सवाल केले आहेत.

“नेहमी प्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा ना विचार किमान उत्तर हवी होती. गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार?, महिनाभरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार? राज्याने महिना भरात लस विकत का घेतली नाही?, शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परीक्षा न घेणे का?, अर्थचक्र कधी फिरणार?, ‘माझं गाव करोनामुक्त’ हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?,” असे सवाल केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले आहेत.

राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन १ जून रोजी सकाळी मुदत संपत असल्याने राज्य सरकार पुढे काय निर्णय, याकडे लोकांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनसंवाद साधत, परिस्थिती नियंत्रणात येत असली, तरी पहिल्या लाटेच्या समान आहे. त्यामुळे लॉकडाउन १५ दिवसांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या जनसंवादात विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.