अमेरिकेत नाट्य व्यवसाय हा जुगार झाला आहे विजय तेंडुलकर यांचे विचार
वॉशिंग्टन, ता. 30 – “अमेरिकेतील प्रेक्षक आणि भारतातील प्रेक्षक यांच्यात मला बरेच साम्य आढळून आले,’ असे उद्गार सॅन फ्रॅन्सिस्को येथे दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध मराठी नाटककार विजय तेंडुलकर यांनी काढले. “जुन्या व नव्या पिढीतील प्रेक्षक या दोघांच्या बाबतीत हे खरे आहे,’ असे त्यांनी निदर्शनास आणले.
तेंडुलकर यांची अमेरिकेला ही पहिलीच भेट आहे. ते म्हणाले, दोन्ही देशातील व्यावसायिक रंगभूमीवर कलात्मकता व विधायकपणा यापेक्षा जुगारी वृत्तीच दिसून येते. अमेरिकन माहितगारांनी मला सांगितले की,
अमेरिकेतील नाट्य हा आता व्यवसाय राहिला नसून एक जुगार बनत चालला आहे. आपल्याकडेही तसेच होत चालले आहे. मात्र दोन्ही देशातील कलावंतांत बौद्धिकदृष्ट्या फरक आहे, असे मला वाटत नाही.
जहाजाचा तरंगत्या धान्य कोठारासारखा उपयोग
वॉशिंग्टन – “मॅनहॅटन’ हे अमेरिकेतील सर्वात मोठे व्यापारी जहाज आहे. अमेरिकन आंतरराष्ट्रीय विकास व्यवस्थेने हे व्यापारी जहाज सहा महिन्यांच्या मुदतीसाठी भाड्याने घेतले असून त्याचा उपयोग बांगला देशसाठी “तरंगत्या धान्य कोठारा’सारखा केला जाणार आहे.
बांगला देशात चितगावजवळ हे “धान्य कोठार’ उभे केले जाईल. समुद्रातून प्रवास करणारी मोठी जहाजे या तरंगत्या कोठारांत धान्याचा साठा आणून ठेवतील. नद्यांतून आणि कालव्यांतून प्रवास करणारी छोटी जहाजे हे धान्य खेडोपाडी नेऊन पोचवतील.
जवानांच्या विधवांनी पुनर्विवाह करावा पेन्शन चालूच ठेवणार
नवी दिल्ली – संरक्षण खात्यातील मृतांच्या विधवांनी पुनर्विवाह केल्यास त्यांची पेन्शन रद्द करावी ही मागणी संरक्षणमंत्री जगजीवनराम यांनी फेटाळली. ते म्हणाले, “विधवांनी पुनर्विवाह करावा, त्याला प्रोत्साहन द्यावे.’