पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही जागा राष्ट्रवादी किंवा भाजपला द्यायचे ठरविल्यास त्यानुसार नियोजन होईल, याला मी हरकत घेण्याचे कारण नाही. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अजितदादांचा उमेदवार असला तरी तो महायुतीचा उमेदवार समजून त्याचे काम करण्याचे ठरविले आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
म्हाडा पुणे मंडळाचे सभापती पदाचा आढळराव पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील या वेळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आढळराव पाटील म्हणाले, माझा पक्ष आणि महायुती शिरूरच्या तिकीटाबद्दल ठरवतील. तिकीट वाटप ठरवताना विजयी उमेदवारानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवाराचा आधी विचार केला जातो. २०१९ मध्ये शिरूरमधून दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेला मिळालेली आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूरची जागा शिवसेनेलाच मिळण्यासाठी मागणी करतील, ‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार नसल्यानेच म्हाडा पुणे मंडळाचा सभापती करण्यात आल्याच्या चर्चेत तथ्य नाही. हा विषय गेल्या दीड वर्षांपासून सुरू होता. चार-पाच महिन्यांपूर्वी मुख्य सचिवांशी चर्चा झाल्यानंतर मंत्रालयातून जिल्हास्तरावर सर्व प्रक्रिया करण्यात वेळ गेला. मला खात्री आहे, महायुतीत ही जागा शिवसेनेलाच मिळेल आणि तेथून मीच उमेदवार असेन. मुख्यमंत्री शिंदे यांनी मला काम चालू ठेवा, थांबवू नका असे सांगितले आहे.