नगर, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष, डीजे मालकांविरोधात कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २१) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांनी सदरचे डीजे जप्त केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते सोडून देण्यात आले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार मच्छिंद्र पांढरकर यांच्या फिर्यादीवरून पैलवान प्रतिष्ठाण मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कांतीलाल लाळगे (रा. नगर), डीजे चालक सागर पांडुरंग गोसावी (रा. क्रांतीनगर, सोलापूर), छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव मंडळाचे अध्यक्ष शुभम ज्ञानेश्वर सुडके (रा. नालेगाव) व डीजे चालक अनवर शेख (रा. पिंपळे गुरवनगर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार तनवीर शेख यांच्या फिर्यादीवरून साई संघर्ष युवा प्रतिष्ठाण मंडळाचे अध्यक्ष शंतनु कांतीलाल जाधव (रा. नगर) व डीजे चालक सोमनाथ तुकाराम राठोड (रा. निमगाव ता. इंदापुर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर मंडळाचे अध्यक्ष व डीजे चालक यांनी मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदुषण केले. पोलिसांनी सांगून देखील आवाज कमी केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.