मुंबई – सुशांत सिंग प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले बिहारचे मावळते डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अखेर राजकारणात एंट्री केली. पांडे यांनी काल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश केला. भाजपशी युती असलेल्या जेडीयूमधून गुप्तेश्वर पांडे यांना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गुप्तेश्वर पांडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु असतानाच आता यावरून काँग्रेसने भाजपचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट केलं असून याद्वारे त्यांनी, ‘फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडेंच्या उमेदवारास निकराने विरोध करायला हवा’ असं मत मांडलं आहे.
आपल्या ट्विटमध्ये सावंत लिहतात, “देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल.”
देवेंद्र फडणवीसजी बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करुन महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या @ips_gupteshwar ना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसजींनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 28, 2020
तत्पूर्वी, पांडे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधत, ‘सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात महाराष्ट्रावर आरोप करण्यासाठी भाजपाने पांडे यांचा वापर केला, त्यानंतर आता त्यांना त्याची बक्षिसी देखील दिली.’ असा आरोप केला होता.