लंडन – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या येथील निवासस्थानाबाहेर जमा होता गो नवाज गो अर्थात नवाज शरीफ येथून परत जा अशा घोषणा देण्यात आल्या.
पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार किमान 20 जणांचा जमाव शरीफ यांच्या घरासमोर जमला होता. यातील काही जणांच्या हातात पोस्टरही होते. आम्ही पाकिस्तानी लष्कराच्या सोबत आहोत, नवाज शरीफ परत जा असे त्यावर लिहिले होते. निदर्शकांनी यावेळी घोषणाबाजीही केली.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर निदर्शक पसार झाले. मात्र या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
नवाज शरीफ यांना पाकिस्तानात भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांत दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र ते आपल्या उपचारांसाठी गेल्या नोव्हेंबरपासून लंडनमध्ये वास्तव्याला आहेत.
आपल्याबाबतच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले आहे. मात्र न्यायालयाने त्यांना अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देउनही ते हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरोधात आता वॉरंट बजावण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लक्ष्य केले होते. आपल्याला तुरूंगात पाठवणाऱ्यांनीच आज देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपला लढा इम्रान यांच्या विरोधात नसून त्या लोकांच्या विरोधात आहे, ज्यांनी लायक नसलेल्या माणसाला पंतप्रधान पदावर बसवले अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानी लष्करालाही लक्ष्य केले आहे.