दुबई -आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ नव्या रंगाच्या आणि ढंगाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. आयसीसी व बीसीसीआयने ही माहिती दिली आहे. भारतीय संघ गेल्या वर्षीपासून नेव्ही ब्ल्यु रंगाच्या जर्सी परिधान करत आहे.
मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी ही जर्सी भारतीय संघाला प्रायोजक असलेल्या एमपीएलकडून मिळालेली होती. आता त्यांच्याचकडून विश्वकरंडक टी-20 स्पर्धेसाठी ही नवी जर्सी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद जरी भारताकडे असले तरीही देशातील करोनाचा धोका अद्याप संपलेला नसल्याने ही स्पर्धा अमिराती व ओमानमध्ये येत्या 19 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.
येत्या बुधवारी (13 ऑक्टोबर) ही नवी जर्सी प्रदर्शीत केली जाणार आहे. टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेतील सर्व सामने दुबई, अबू धाबी आणि यूएईच्या शारजामध्ये खेळले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 45 सामने खेळले जाणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये खेळला जाईल. यावेळी या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी -20 मध्ये भारताने जेतेपद पटकावले.
यंदाही भारताकडून अशीच अपेक्षा केली जाते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपरहिट सामनादेखील पाहायला मिळणार आहे. येत्या 24 ऑक्टोबरला हे दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देणार आहेत. या मोठ्या सामन्याचे क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
बॅट्समन नव्हे आता बॅटर
आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपासूनच खेळाडू, पंच, सामनाधिकारी, माध्यमे व प्रेत्रकांसह समालोचकांनाही बॅट्समन ऐवजी बॅटर या शब्दाचा वापर करावा लागणार आहे. गेल्या महिन्यात मेरीलीबोर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) स्त्री-पुरुष समानतेसाठी बॅट्समनच्या जागी बॅटर हा शब्द क्रिकेट नियमावलीत बदलला होता.