दुबई –बेस्ट फिनिशर महेंद्रसिंग धोनी याचा समावेश आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये का करण्यात आला नाही, अशी टीका सुरू झाली होती. मात्र, कोणताही क्रिकेटपटू निवृत्त झाल्यावर किमान पाच वर्षांनी त्याचा या सन्मानासाठी विचार केला जातो असा निकष आहे. त्यामुळे 2025 साली धोनीचा समावेश होईल, असा खुलासा आयसीसीने केला आहे.
भारताच्या स्वतंत्रदिनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर काही दिवसांतच आयसीसीने तीन खेळाडूंची हॉल ऑफ फेम सन्मानासाठी निवड केली होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जॅक कॅलिस, पाकिस्तानचे माजी कसोटी क्रिकेटपटू झहीर अब्बास व मूळ भारतीय वंशाची पण ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळलेली महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकर यांना हॉल ऑफ फेमने सन्मान करण्यात आला होता. या यादीत धोनीचा समावेश झाला नसल्याने अनेकांनी आयसीसीवर टीका केली होती. मात्र, नियम नक्की काय आहे याची माहिती देत आयसीसीने खुलासा केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर 5 वर्षांनी खेळाडूचा या सन्मानासाठी विचार केला जातो. याच नियमाच्या आधारावर राहुल द्रविड व अनिल कुंबळे या दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंना सचिन तेंडुलकरच्या आधी हा सन्मान दिला गेला होता. 2012 साली निवृत्त झालेल्या द्रविडला 2018 साली या यादीत स्थान मिळाले होते. सचिनने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यानंतर 2019 साली त्याचाही सन्मान केला गेला. याकडे आयसीसीने लक्ष वेधले आहे.