ICC ODI And T20I Ranking, Babar Azam-Shubman Gill : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा वनडेमधला नंबर वन फलंदाज बनला आहे. बाबरने भारतीय फलंदाज शुभमन गिलची राजवट संपवली आणि नंबर वनचा मुकुट आपल्या डोक्यावर घेतला.
याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईकडूनही हा मुकुट हिसकावण्यात आला आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद टी-20 गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी नवीनतम क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये हे बदल दिसून आले.
बाबरने 824 रेटिंग मिळवून एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. गिल 810 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचवेळी आदिल रशीदने टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला मागे टाकले. इंग्लिश फिरकीपटू रशीदने 715 रेटिंग मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
अफगाणिस्तानचा राशिद खान 692 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. माजी नंबर वन रवी बिश्नोई 685 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या यादीतील टॉप-5 वर नजर टाकली तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा 679 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि महिश तीक्षाना 677 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.
कोहली तिसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर…
एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहली 775 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्मा 754 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित आणि कोहली यांनी फलंदाजीने चमकदार कामगिरी केली होती. तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 745 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.