विनिता शाह
राजकीय नेते आणि अधिकारी यांचे वाद नवीन नाहीत. आता सोशल मीडियावरून हे वाद जगभरात पोचत आहेत. झारखंडच्या देवघरचे जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी मंजुनाथ भजंत्री हे आपल्या भागातील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या ट्विटर वॉरवरून चर्चेत आले. देवघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्यासह नऊ जणांवर आरोप केल्याने खळबळ उडाली. देवघर विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये जबरदस्तीने घुसखोरी करून कायद्याचे उल्लंघन केल्याचे त्यांनी आरोपात म्हटले होते. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
मात्र, नेतेदेखील गप्प बसले नाहीत. त्यांनी प्रत्युत्तर देत दिल्लीत एक झिरो एफआयआर दाखल करत मंजुनाथ यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याबरोबरच देशद्रोहाचा आरोप देखील केला. प्रत्यक्षात मंजुनाथ आणि निशिकांत यांच्यात तू तू-मैं मैं होण्याची ही पहिली वेळ नाही.
गेल्यावर्षी देवघर येथील मधुपूर विधानसभा क्षेत्रातील पोटनिवडणुकीतही दोघांत वाद झाला. तेव्हा खासदारांच्या तक्रारीनुसार निवडणूक आयोगाने त्यांना देवघरच्या जिल्हाधिकारी पदावरून हटविले. निवडणूक झाल्यानंतर आठ दिवसांच्या आतच पुन्हा त्यांना जिल्हाधिकारीपदी नेमण्यात आले.
ग्रामीण भागातून आलेले मंजुनाथ हे चर्चेत राहणारे अधिकारी आहेत. 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी मंजुनाथ यांनी आयआयटी बॉम्बेतून बी. टेक्ची पदवी घेतली. तेथून पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला
कॉर्पोरेट नोकरी केली आणि नंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरविले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात आयपीएस परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना घरचे कर्नाटकचे केडर मिळाले; परंतु रॅंकिंग चांगले आल्याने त्यांनी आयएएसची निवड केली आणि झारखंड केडरमध्ये समावेश झाला. नीती आयोगाच्या थिंक टॅंक अधिकाऱ्यांच्या गटात ते सामील होते.
मंजुनाथ यांचे वडील जंगलातून लाकडे गोळा करण्याचे काम करत होते. सहा भावंडांचे कुटुंब असलेल्या मंजुनाथ यांचे सुरुवातीचे दिवस गरिबीत आणि संघर्षात गेले. वडील स्वत: शिक्षण घेऊ शकले नाही; परंतु मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले आणि मंजुनाथ यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले.