न्यूयॉर्क : अफगाणिस्तानात तालिबानने रविवारी ताबा मिळवला आणि जगात एकाच गोंधळ उडाला. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय हा अमेरिकेतील नागरिकांचा विचार केल्यास योग्यच असल्याचे म्हटले आहे. तसेच भूतकाळात केलेल्या चुका आपण पुन्हा करणार नाही असे म्हणत आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचेही म्हटले आहे.
अफगाणिस्तानात तालिबानने अपेक्षेपेक्षा फार लवकर सत्ता काबीज केली तरी तेथून सैन्य माघारीच्या निर्णयावर आपण ठाम आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर आता बायडेन यांनी अमेरिकेतील आणखीन किती पिढ्या आपण अफगाणिस्तानमधील युद्धामध्ये लढण्यासाठी पाठवणार आहोत असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“अफगाणिस्तानचे लष्करच लढण्यास तयार नाही तर आपण अमेरिकन मुली आणि मुलांच्या किती पिढ्या अफगाणिस्तानमधील युद्ध लढण्यासाठी पाठवात राहणार आहोत? मला यासंदर्भातील माझं उत्तर योग्य वाटतं. आपण यापूर्वी भूतकाळात केलेली चूक मी पुन्हा घडू देणार नाही,” असे जो बायडेन म्हणाले आहेत. आपण आपल्या निर्णयावर ठाम असून तोच अमेरिकेच्या दृष्टीने हिताचा असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.
मंगळवारी बायडेन यांनी व्हाइट हाऊस येथून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, “अफगाणिस्थान सरकार तालिबानच्या दबावामुळे नाट्यमयरीत्या कोसळले असून तेथील भयानक परिस्थितीला अमेरिका जबाबदार नाही. तेथे काही लोक विमानांच्या पंखांना पकडून लोंबकळताना दिसल्याची दृश्ये प्रसारित झाली आहेत.
अफगाणिस्तानातील दृश्ये काळीज गोठवून टाकणारी आहेत. पण अमेरिकी सैन्य माघारीसाठी यापेक्षा कुठली वेगळी वेळ चांगली होती असे वाटत नाही, सैन्य माघारीच्या निर्णयावर आपण ठाम आहोत. त्याच्या परिणांची जाणीव असल्यानेच आम्ही आपत्कालीन उपाययोजना केल्या होत्या. आपण अमेरिकी लोकांच्या पाठीशी आहोत. अमेरिकेचे समर्थन असलेले सरकार व लष्कर यांनी तालिबानला सत्ता घेऊ दिली. अपेक्षेपेक्षा जास्त लवकर तालिबानने हे करून दाखवले,”असेही त्यांनी यावेळी म्हटले.