सचिनमुळेच क्रिकेटकडे वळलो – वीरेंद्र सेहवाग

1992 सालच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील सचिनच्या कामगिरीने मिळाली प्रेरणा

नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियात 1992 साली झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहूनच प्रेरणा मिळाली व म्हणूनच क्रिकेटची गोडी लागली. सचिनची कॉपी करण्याचा प्रयत्न केला, असे मत भारताचा आक्रमक सलामीवीर व माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्‍त केले आहे.

क्रिकगुरू या ऍपच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सेहवागने विविध विषयांवर आपली मते मांडली. 1992 साली झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत सचिनचा खेळ पाहून खूपच प्रभावित झालो व क्रिकेटपटू बनण्याचे ध्येय उराशी बाळगले. सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह, बॅकफुट पंच या गोष्टी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करताना अनेकदा सचिनची कॉपीही करायचो, असे सेहवागने सांगितले.

ऑनलाइन संवाद साधणे किंवा व्हिडिओ पाहून त्यानुसार खेळ करणे अशा सुविधा त्यावेळी मिळाल्या नाहीत. आताचे खेळाडू याबाबतीत खूप नशीबवान आहेत. माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला या गोष्टी मिळाल्या असत्या तर मीदेखील खूप लहान वयातच क्रिकेटमध्ये पदार्पण केले असते, असेही सेहवागने सांगितले. लहानपणापासून सचिनची फलंदाजी पाहात त्याच्यासारखीच फलंदाजी करायचो.

सचिनची कॉपी मीच नव्हे तर जगातील कोणताही फलंदाज करु शकणार नाही हे मला त्यावेळी समजले. त्यानंतर जेव्हा भारतीय संघात निवड झाली व सिचनसह फलंदाजीला यायची संधी मिळाली तेव्हा कोणत्या गोलंदाजाला कसे खेळायचे याचे धडेही मिळाले. तेव्हापासून मी माझी स्वतंत्र शैली निर्माण केली, असेही सेहवाग म्हणाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.