मुंबई – ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 98 वर्षीय दिलीपकुमार यांना खार उपनगरातील हिंदुजा रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तेथे त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
सर्वांच्या आशीर्वादाने व प्रार्थनेमुळे दिलीपसाहेब सुखरूप रुग्णालयातून घरी जात असल्याचे ट्विट त्यांच्या पत्नी सायराबानू यांनी दिलीपकुमार यांच्याच अधिकृत ट्विटर हॅंडलवर प्रसारित केले आहे.
त्यांना गुरुवारीच घरी सोडण्यात येणार होते पण त्यांच्या डॉक्टरांनी आणि नातेवाइकांनी त्यांना आणखी एक दिवस रुग्णालयातच विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना आज घरी जाऊ देण्यात आले. गेल्या महिन्यात त्यांना येथे चाचण्यांसाठी दाखल करण्यात आले होते.