I.N.D.I.A. ALOLIANCE PM CANDIDATE – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये विजयाच्या निश्चितीसाठी सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसने मित्रपक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूकडील मित्रपक्ष बैठकांमध्ये खलबतं करताना दिसत आहेत. केंद्रात २०१४ पासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी इंडियन नॅशनल डेवलेपमेंट इन्क्लूसिव अलायंस अर्थात I.N.D.I.A. आघाडीची स्थापना केली आहे.
सत्ताधारी भाजप एकीकडे विरोधकांच्या ही आघाडी टिकणार नसल्याची टीका करत असला तरी सावध पावलं टाकत N.D.A आघाडीतील आपल्या मित्रपक्षांशी भेटीगाठी करत आहे. अशातच I.N.D.I.A. आघाडीची स्थापना झाल्यापासूनच सातत्याने विचारल्या जाणाऱ्या, विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? या प्रश्नाला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने उत्तर दिल आहे.
काँग्रेस नेते पी.एल. पुनिया यांनी याबाबत मोठं विधान करताना, ‘२०२४ लोकसभा निवडणुकांनंतर विरोधकांच्या आघाडीतील निवडून आलेले खासदारचं आमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवतील’ असं सांगितलं आहे. काँग्रेसने पुढाकार घेत स्थापित केलेल्या I.N.D.I.A. आघाडीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, आरजेडीचे लालू प्रसाद यादव, जेडीयूचे नितीश कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार अशा दिग्गज मंडळींचा समावेश आहे. यामुळे ही आघाडी निवडणुकांमध्ये एकत्र लढणार असेल तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. भाजपने देखील हाच धागा पकडत ही आघाडी टिकणार नसल्याचं म्हंटलं होत. मात्र पुनिया यांनी निवडणुकांनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवणार असं स्पष्ट करत हा प्रश्न बाद करण्याचा प्रयत्न केला आहे.
वैयक्तिक महत्वाकांक्षांना आवर?
विरोधकांच्या I.N.D.I.A. आघाडीमध्ये असलेला मातब्बर नेत्यांचा समावेश ही आघाडी टिकण्यासाठी अडचणीचा ठरू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अशातच विरोधक वैयक्तिक महत्वाकांक्षांना आवर घालत, पंतप्रधानपदाबाबतचा निर्णय लोकसभा निवडणुकांनंतर घ्यायचा ठरवून एकत्र लढण्याच्या निर्णयापर्यंत पोचतानाचे चित्र पुनिया यांच्या वक्तव्यानंतर दिसत आहे.
विरोधकांची पुढील बैठक मुंबईत
काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, जदयू, राजद यांसह एकूण २८ राजकीय पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या असून पहिली बैठक पाटणा येथे तर दुसरी बैठक बंगळुरू येथे पार पडली . आता, इंडिया आघाडीची तिसरी आणि महत्त्वाची बैठक मुंबईत होतहोणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे या बैठकीचं यजमानपद आहे.
शरद पवार बैठकीत कोणती भूमिका घेणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अशात, पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवार व अजित पवार यांची नुकतीच एक बैठक झाली होती. पवार काका – पुतण्याच्या या भेटीबाबत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ झाल्याचं पाहायला मिळालं होत. अशात विरोधकांच्या बैठकीत शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.