पुणे – इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायीकास अर्धनग्न करुन मारहाण करण्यात आली. यानंतर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. याप्रकणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल व्यवहारे आणि शिवंकर कडू (दोघेही रा.भारती विद्यापीठ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन घनवट (28,रा.नऱ्हे) याने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सचिन याची एस.जी. एंटरटेनमेंट नावाची इव्हेंट कंपनी आहे. त्याची 2020 मध्ये राहुल व्यवहारे बरोबर ओळख झाली होती. या ओळखीतून पुढे त्याची शिवंकर आणि जगताप या दोघांबरोबरही ओळख झाली. हे सर्वजण इव्हेंटची कामे करतात.दरम्यान राहुल व्यवहारे याने सचिनच्या ओळखीच्या कलाकारांशी ओळख वाढवून, त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केले.
तसेच सचिन याची बदनामी केली होती. यामुळे सचिनने राहुलशी बोलणे बंद केले होते. दरम्यान 14 ऑगस्ट रोजी शिवंकर याने सचिनला स्वामी नारायण मंदिर येथे कॉफी पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. तेथे राहुलने येऊन माझी बदनामी करतो का? असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर बाहेर जाऊ असे म्हणत शेजारच्या गल्लीत नेले.
ते दोघांनी शिवीगाळ करुन अर्धनग्न करत मारहाण केली. तेथे जबरदस्ती माफी मागायला लावून राहुलने व्हिडिओ शुट केला. त्यानंरत तेथे जगताप आल्यावर मध्यस्थी करुन कपडे घालयाला दिले. आरोपी शिवंकरने स्वत:च्या गाडीवर सचिनला रात्री घरी सोडले.
मारहाणीमुळे सचिन दोन दिवस घरीच होता. दरम्यान त्याला आरोपी शिवंकर व इतर ओळखीच्या व्यक्तींनी मारहाणीचा व्हिडिओ पाठवला. यानंतर सचिनने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर करत आहेत.