Parbhani Lok Sabha Election 2024 : अब की बार, भाजपा तडीपार करायची आहे. कारण, हे आपला महाराष्ट्र लुटत आहेत, आपले उद्योग पळवून नेत आहेत. त्यामुळे, बंडु जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करा, असे म्हणत महादेव जानकरांचं (Mahadev Jankar) डिपॉझिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परभणीतील सभेतून केलं. महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav) ह्यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ह्यांची आज परभणीत जाहीर सभा पार पडली. सभेवेळी पाऊस सुरु होता. भरपावसात ही सभा पार पडली. (Uddhav Thackeray’s rally in Parbhani)
उद्धव ठाकरे म्हणाले, परभणी हा माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भाजपा आणि मिंध्यांना वाटतं की, सगळं काही पैशाने विकत घेता येतं. पण, परभणीकर हा पैशाने विकला जाणारा नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच, जय भवानी हा शब्द आपल्या प्रचार गीतामधून काढण्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. मात्र, मी तो शब्द काढणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताच, पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी, लोकांनी पावसात भिजून सभा ऐकली. तर, उद्धव ठाकरेही पावसात भिजल्याचं दिसून आले.
तुम्ही प्रेमाने आलात तेव्हा आम्ही मिठी दिली होती, पण आता… –
यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही प्रेमाने आलात तेव्हा आम्ही मिठी दिली होती, पण आता माझी वाघनखेर बाहेर आली आहेत, अशा शब्दात भाजपाला इशारा दिला. यावेळी, सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जाहीर सभेत, मोदींसमोरील सभेत बहिण-भावाच्या नात्याबद्दल विचित्र बोलले. महिलांचा अवमान करण्याचं काम या नेत्यांकडून होत आहे. यापूर्वीही सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना मराठवाड्यातील एका मंत्र्याने शिवी दिली होती. मात्र, मोदी-शाह यावर काहीही बोलायला तयार नाही. महिलांचा अपमान चालेल, पण आम्हाला मतं द्या, हीच त्यांची भूमिका आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.